
मेहरून्नीसा प्रवेशद्वार; मेहरूणची ओळख पुसून टाकण्याचा हा प्रयत्न- सभापती राजेंद्र घुगे-पाटील
जळगाव | काल झालेल्या महासभेत बहुतांश विषय सर्वसंमतीने मंजूर करण्यात आले. मात्र यातील ममता हॉस्पीटलजवळ मेहरूण गाव हे वारसा असणार्या मेहरून्नीसा यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारण्याचा एमआयएमचे गटनेते जाकीर बागवान यांचा प्रस्ताव मात्र स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या विरोधामुळे फेटाळण्यात आला. घुगे पाटील म्हणाले की, मेहरूणची ओळख पुसून टाकण्याचा हा प्रयत्न असून मेहरून्नीसा वगळता कोणतेही नाव दिले तर आमचा याला विरोध नाही. तर, माजी महापौर नितीन लढ्ढा आणि एमआयएमचे गटनेते जाकीर बागवान यांनी या प्रकरणी भाजपवर टीका केलेली आहे.
शिवसेनेचे नितीन लढ्ढा पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, मेहरूणची ओळख ही मेहरून्नीसा यांच्या नावावरून आहे. आधी या गावाचे मेहरून्नीसा नाव होते. काळाच्या ओघात याचा मेहरूण असा अपभ्रंश झाला आहे. तर, फक्त प्रवेशद्वाराचा विषय असतांनाही भाजपच्या सदस्यांनी संकुचीत विचारसरणीमुळे याला विरोध केल्याचा आरोप लढ्ढा यांनी केला.
एमआयएमचे गटनेते रियाज बागवान यांनी राजेंद्र घुगे पाटलांनी आधी मेहरूणच्या इतिहासाचा अभ्यास करावा असा टोला मारला. ते म्हणाले की, शहरात अनेक ठिकाणी प्रवेशद्वारे उभारण्यात आली असून याला विविध महापुरूषांची नावे देण्यात आली आहेत. मात्र मेहरून्नीसा यांच्या नावाला केलेला विरोध हा चुकीचा असल्याचा आरोप बागवान यांनी केला.