
जळगाव महापालिकेने जे. के. पार्क घेतले ताब्यात; बघा काय आहे प्रकरण
जळगाव प्रतिनिधी | कराराची मुदत संपलेल्या जे. के. पार्कची जागा ३० दिवसांत ताब्यात देण्याचे आदेश महापालिकेने काढले होते. मुदत संपल्यानंतरही जागेचा ताबा ठेवल्याप्रकरणी, मुदत संपल्यापासून नुकसानभरपाई अदा करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे महिनाभरानंतर प्रत्यक्षात जे. के. पार्कची जागा ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली आहे.
नगरपालिका असताना तत्कालीन मुख्याधिकार्यांनी १९८९ साली जे.के. डेव्हलपर्स यांना मेहरूण मधील शिवाजी उद्यानातील जागा करारनाम्याच्या माध्यमातून दिली होती. यात स्वखर्चाने मिनी ट्रेन, मेन स्टेशन, मेरी गो राऊंड, इलेक्ट्रिक झुला आदींसाठी ११५ बाय ९५ चौरस मीटर अर्थात १० हजार ९२५ चौरस मीटर जागेमध्ये बसवण्याचे नमूद करण्यात आले होते. या ३० वर्षांच्या करारनाम्याची मुदत २६ डिसेंबर २०१९ रोजी संपली असली तरी ही जागा विकासकांच्याच ताब्यात आहे. यासंदर्भात नगरसेविका अॅड. शुचिता हाडा यांनी स्थायी समिती व महासभेत विषय मांडून कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने आता जे.के. डेव्हलपर्स यांना ९ मार्च २०२१ रोजी आदेश काढले होते. आणि आज दि. ७ एप्रिल २०२१ रोजी प्रत्यक्षात हि जागा जळगाव महापालिकेकेने ताब्यात घेतली आहे.
९ मार्च पासून जे.के. पार्कची जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झालेल्या असल्याचे पालिकेने स्पष्ट केले होते. मात्र आधी देखील हे प्रकरण खूप गाजले असतांना यावर कार्यवाही झालेली नव्हती. परिणामी आता तरी ही जागा महापालिकेच्या ताब्यात येईल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. महापालिकेने आज हि जागा ताब्यात घेऊन, मुदत संपल्या पासुन आता पर्यंतची जागेच्या नुकसानीची भरपाई पालिकेला करावी अशी नोटीस पालिकेने जे.के डेव्हलपर्स यांना बजावली असल्याची माहिती मिळाली आहे.