‘दोनवर्ष जनसेवेची महाविकास आघाडीची’ मोहिमेंतर्गत राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आयोजन पालकमंत्री सुभाष देसाई यांचे हस्ते 1 मे रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन
औरंगाबाद, दि. 28 एप्रिल, प्रतिनिधी
:- ‘दोनवर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची’या मोहिमेंतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने औरंगाबाद विभागीय माहिती कार्यालयातर्फे शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सचित्र प्रदर्शनाचे आयोजन 1 ते 5 मे 2022 या कालावधीत सिमंत मंगल कार्यालय, जिल्हा परिषद समोर, औरंगपूरा, औरंगाबाद येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते 1 मे रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे,
या प्रदर्शनात गेल्या दोन वर्षात शासनाने कोरोनासारख्या कठीण काळात केलेली कामगिरी, कृषी, आदिवासी विकास, शिवभोजन, महाआवास योजना, आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासह समाजातील सर्वच घटकांचा सर्वंकष विकास अशा विकासात्मक कामकाजाची माहिती सचित्र पद्धतीने बघता येणार आहे.
प्रदर्शन असेल 1 ते 5 मे पर्यंत
हे राज्यस्तरीय प्रदर्शन नागरिकांसाठी 1 ते 5 मे 2022 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत खुले राहणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांनी विविध कल्याणकारी शासकीय योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव दीपक कपूर यांनी केले आहे.