
चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरेंवर कारवाई करा! इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांची मागणी..!
मुंबई,
राज्यभरात ‘ईद‘ नंतर ४ मे पासून मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेतून जमलेल्या नागरिकांना चिथावणी दिल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी इंडिया अगेस्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली आहे. यासंबंधी सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल केली असून, विभागाकडून योग्य कारवाई केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित सभेतून मनसे प्रमुखांनी केलेले वक्तव्य समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारे असून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारे आहे, असा दावा पाटील यांनी केला.मनसेला काही अटी-शर्तीच्या अधीन राहून पोलिसांनी सभेसाठी परवानगी दिली होती.पंरतु,या अटींचे उल्लंघन करीत धार्मिक सौहार्द बिघडवण्याचे काम करीत चिथावणीखोर वक्तव्य केल्याने ठाकरे यांच्यावर कडक कारवाई करावी,असे पाटील म्हणाले.उद्या,सोमवारी औरंगाबाद पोलीस आयुक्तांची भेट घेवून यासंबंधी ते निवेदन सादर करणार असल्याचे पाटील म्हणाले.
देशाचे राष्ट्रीय नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांवर ठाकरे यांनी केलेली टीका निंदणीय आहे.पवार साहेबांचे नाव पुढे करून ठाकरे समाजात विष कालवण्याचे काम करीत असल्याचा घणाघाती देखील पाटील यांच्याकडून करण्यात आला.पवार साहेबांसारख्या राष्ट्रीय नेतृत्वावर टीका करून जनमानसात असलेली त्यांची प्रतिमा राजकीय फायद्यासाठी मलीन करण्याचा प्रयत्न मनसे प्रमुखांनी केला आहे.पंरतु, पवार साहेबांवर जनमानसाची अतुट श्रद्धा, विश्वास असून ठाकरे यांच्या भ्रामक टीकेनंतर त्यात कुठलाही तडा जाणार नाही, असे पाटील म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिक्षेपक संबंधी घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असतांना जाती तेढ निर्माण होईल व प्रक्षोभक भाषण,वंश-जात-धर्म-वर्ण-प्रदेश यावरून चिथावणीखोर वक्तव्य करून नये अशा अनेक कायद्यांची पायमल्ली करीत न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून महाराष्ट्र पोलीस कायद्यांचा व अनेक भारतीय दंड संहिता कलमाचा मनसे कडून भंग करण्यात आल्याने राज ठाकरेंवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हेमंत पाटील यांनी केली आहे.