जैन इरिगेशन चे किशोर कुळकर्णी यांचा ‘घडवा सुंदर हस्ताक्षर’ उपक्रम महाराष्ट्रात वाखाणण्यासारखा आहे

  आरिफ आसिफ शेख ,जळगाव

   एखाद्या कलाकाराची चित्रकृती अत्यंत सुंदर अशी असेल तर आपण ते पूर्णपणे न्याहाळतो. अगदी तसेच जर अक्षर सुंदर असेल तर ते लिहिलेलं मजकूर वारंवार वाचावसं वाटतं. हल्ली हस्ताक्षरावरून मनुष्याच्या स्वभावाचा कयास लावला जातो. सुंदर हस्ताक्षर असेल तर तुमची मनोवृत्ती आणि स्वभावाची ओळख होते. म्हणूनच विद्यार्थी दशेतच सुंदर हस्ताक्षराचे धडे गिरवले जावेत, या उदात्त हेतूने जळगाव येथील पत्रकार किशोर कुलकर्णी हे ‘घडवा सुंदर हस्ताक्षर’ हा उपक्रम 1995 पासून राबवत असून निरंतर सुरु आहे. महाराष्ट्रात आणि मध्यप्रदेशसारख्या राज्यात देखील त्यांनी हे हस्ताक्षर घ़डवण्याची कार्यशाळा घेतली आहे.

हस्ताक्षर हे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. ज्या व्यक्तीचे हस्ताक्षर सुंदर त्याच्याकडे यश, सन्मान आणि समृद्धी चालत येते अशा दृढ भावनेने अक्षर चळवळीसाठी लेखक व पत्रकार किशोर कुळकर्णी कार्यरत आहेत. किशोर कुलकर्णी यांना सगळे प्रेमाने केके म्हणतात. त्यांचा ‘घडवा सुंदर हस्ताक्षर’ हा उपक्रम गेली बावीस वर्षें अखंड सुरू आहे. संगणक व इंटरनेटचे युग आले तरी लेखनकलेची जागा कोणी घेऊ शकत नाही, किंबहुना त्या तंत्रज्ञानामुळे हस्ताक्षरास वाव मिळेल या विश्वासाने पत्रकार किशोर कुळकर्णींचे काम सुरू आहे. ते म्हणतात, की ‘गुगल हँण्डरायटींग अॅप्लिकेशन’ मुळे मोबाईल स्क्रिनवर अक्षर गिरवले असता, ते युनिकोडमध्ये आपोआप टाईप होऊन परावर्तित होते. त्यामुळे ते तंत्र हस्ताक्षर लेखनास पूरक ठरत आहे असे त्यांचे मत आहे.

किशोर कुलकर्णी जळगावच्या “जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड’ मध्ये मीडिया विभागात संपादक म्हणून गेल्या 20 वर्षांपासून कायर्रत आहेत. त्यांचा जन्म अमळनेर तालुक्यातील करणखेडा या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण गावी घेतले. पुढे अमळनेरच्या ‘प्रताप महाविद्यालया’तून शिष्यवृत्ती घेत 1992-93 मध्ये अर्थशास्त्र विषयाची पदवी घेतली. महाविद्यालयात असताना बुद्धिवान आणि संघर्षशील विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख होती. नाशिक येथील ‘एचपीटी कॉलेज’मधून पत्रकारितेची पदवी त्यांनी घेतली. त्या दरम्यान, त्यांची भेट ‘अक्षर सुधार आंदोलक’ नाना लाभे यांच्याशी झाली. नानांनी कुलकर्णींच्या अक्षरांना सुंदर वळण दिले. कुलकर्णी नाना लाभे यांच्या कार्यामुळे प्रभावित झाले. त्यांनी त्या कामी 1996 पासून लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यांचा ‘घडवा सुंदर अक्षर’ हा उपक्रम तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुरू झाला. ‘जैन इरिगेशन’चे संस्थापक भवरलाल जैन यांनीही त्यांच्या उपक्रमास प्रोत्साहन दिले.

 

किशोर कुळकर्णी ‘घडवा सुंदर हस्ताक्षर’ या उपक्रमासाठी गावा-गावांत जाऊन शाळांमध्ये सहज, सुंदर स्वच्छ आणि सरळ अक्षर कसे काढावे याबाबत प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन करतात, व्याख्यान तर देतातच. शालेय विद्यार्थीच नव्हे तर प्रौढ, उच्चपदस्थ व्यक्तींचेही हस्ताक्षर सुधरवण्यास किशोर कुळकर्णी यांचा हातखंडा राहिलेला आहे. त्यांच्या उपक्रमाने तीन हजारांहून अधिकांचे हस्ताक्षर सुघड झाले आहे.

आधुनिक युगात संगणकाद्वारे शिक्षण देण्याच्या तऱ्हतऱ्हा लागू होत आहेत. लिखाणाद्वारे शिक्षण किंवा शिक्षित करण्याच्या पद्धती कालबाह्य होऊ पाहत आहेत. त्यामुळे लिखाण कमी-कमी होऊन हस्ताक्षरांमध्ये बिघाड होत आहे. टाईपरायटरद्वारेही पूर्वी अक्षर अंकित केले जाई. टाईपरायटरची जागा कॉम्प्युटरने घेतली तरीदेखील हस्तलिखिताचे प्रमाण कमी झाले नाही.

आपले हस्ताक्षर हे आपली एक ओळख किंबहूना हस्ताक्षरांमुळे मनुष्याचे व्यक्तिमत्व ठरवले जाऊ लागले. हस्ताक्षराला इतके महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्याचे अक्षर सुंदर, वळणदार तर ती व्यक्ती प्रसन्न, नीटनेटकी, शिस्तप्रिय असते असे म्हटले जाते. किशोर कुलकर्णी यांनी ‘घडवा सुंदर हस्ताक्षर’ हे बावीस पानी पॉकेट बुक प्रकाशित केले आहे. त्यांच्या ‘पासवर्ड सुंदर अक्षराचा’ या पुस्तकाचे प्रकाशन 8 जानेवारी 2016 रोजी अनिल अवचट यांच्या हस्ते झाले. त्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती 2 सप्टेंबर 2017 रोजी एकनाथ खडसे यांच्या हस्ते प्रकाशित झाली. ‘अर्धशतकी लग्नगाठ’, ‘घडवा सुंदर हस्ताक्षर’, ‘ब्लॉगवाल्या आजीबाई’, ‘ज्ञानवाणी’, ‘पासवर्ड सुंदर अक्षराचा’ ही पुस्तक प्रकाशित झाली आहेत.

जळगाव जिल्हयातील काही मान्यवरांना त्यांच्या आईने संस्कारित केले याबाबतचे अनुभव, चरित्रात्मक लेखन असलेलं ‘आमची आई’ हे किशोर कुलकर्णीं लिखित पुस्तक गेल्या डिसेंबर 2018 ला ‘ग्रंथाली’ ने प्रकाशित केलं आहे.

‘घडवा सुंदर हस्ताक्षर’ या उपक्रमांतर्गत किशोर कुलकर्णी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यावर भर देतात. शालेय विद्यार्थ्यांचे अक्षर सुधारण्यासाठी भर दिला तर ते जास्त परिणामकारक ठरू शकते असे ते म्हणतात. ते विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षराचे धडे शास्त्रोक्त पद्धतीने देतात. हस्ताक्षर सुंदर दिसण्यासाठी, टपोरे वळणदार दिसण्यासाठी काय केले पाहिजे, वर्णातील मुख्य रेषा, ती सरळ काढली जावी, मोठी असावी, अक्षरातील उंची, अक्षरातील दोन वर्णांचे अंतर, जाडी, लेखणी-पेन कोणता असावा, कागदावर पेन कसा चालवावा, पेन चालवण्याची दिशा, लिहिण्याची गती, वळण, कसे व कोठे थांबवावे आदी मुद्यांसह किशोर कुलकर्णी सोदाहरण मार्गदर्शन करतात.

जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच, महाविद्यालयांमध्ये जाऊन सुंदर अक्षर कसे काढावे ह्यासंबंधी प्रात्याक्षिकांसह व्याख्याने देण्याचा त्यांचा विचार आहे. त्यांनी तळमळीने, चिकाटीने व निरपेक्ष भावनेने केलेल्या या कार्याबद्दल पुरस्कार, गौरवरूपी शाबासकीची थापदेखील मिळाली आहे. हस्तलेखनाचे भूर्जपत्र ते पत्र असे सुमारे अडीचशेहून अधिक दुर्मीळ अक्षरांचे नमुनेदेखील त्यांच्याकडे आहेत. त्यांचे प्रदर्शन अनेक ठिकाणी झाले आहे. ‘शब्द वाटू धन जनलोका’ यानुसार किशोर कुलकर्णींच हे अक्षर धन वाटण्याचे काम मोठ्या तळमळीने सुरु आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close