
कुष्ठरोग निर्मुलनासाठी ‘स्पर्श’ जनजागृती अभियान
– Bhavesh Dhake
कुष्ठरोग निर्मुलनासाठी ‘स्पर्श’ जनजागृती अभियान
पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. ३० जानेवारी हा कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने दि. ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२३ दरम्यान जनजागृती पंधरवडा राबविण्यात येणार असून, जनजागृती व लोकसहभागासाठी राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या वर्षीचे ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानासाठी ‘कुष्ठरोगाविरुध्द लढा देऊया, कुष्ठरोगाला इतिहासजमा करूया’ असे घोषवाक्य देण्यात आले आहे. व्यापक लोकजागृतीसाठी दि. २६ जानेवारी रोजी सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्यात येणार आहेत.
‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२३ नियोजनासाठी राज्यस्तरीय समन्वय समितीची बैठक दि. २५ जानेवारी रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना यांच्या अध्यक्षतेखाली दृकश्राव्य माध्यमाद्वारे घेण्यात आली. यात त्यांनी कुष्ठरोगाविषयी समाजामध्ये अनेक गैरसमज पसरलेले आहेत. समाजामध्ये जागरूकता व शास्त्रीय माहितीच्या अभावामुळे कुष्ठरुग्णांविषयी भेदभाव केला जातो. ज्यामुळे रोगाचा प्रसार आणि उपचाराबाबत गैरसमज वाढतात. त्यामुळे कुष्ठरुग्णांच्या जीवनातील अनेक पैलूंवर परिणाम होतो. कुष्ठरुग्णांची सामाजिक स्थिती, रोजगाराच्या संधी, विवाह आणि कौटुंबिक जीवन आदींवर त्याचा परिणाम होतो. या कलंकाचे व भेदभावाचे निराकरण करण्यासाठी व समाजात जागरुकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान ही राष्ट्रव्यापी मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व विभागांनी या अभियानात सक्रिय सहभागी होऊन कुष्ठरोगाला हद्दपार करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
या बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, शालेय शिक्षण विभाग, सामाजिक न्याय विभाग, एकात्मिक बाल विकास योजना, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, भारतीय वैद्यकीय संघटना, अलर्ट इंडिया, राज्य आशा समन्वय विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.