
धुळे –अवघ्या चार तासात लाखो रुपयाची रोकड आणि सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना,चोरी झाल्याने प्लॉट घेण्याचे स्वप्न अपूरेच राहणार
अब्दुल रहमान मलिक यांची रिपोर्ट
धुळे –शहरातील चितोडरोड परिसरात असलेल्या संभाप्पा कॉलनीत काल सायंकाळी अवघ्या चार तासात लाखो रुपयाची रोकड आणि सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली . विशेष म्हणजे यावेळी परिसरातील लाईट गेल्याने त्याचाही संदर्भया चोरीशी जोडला जात असून रात्री १० वाजता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लागलीच पोलिसात खबर देण्यात आली . शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देवून पहाणी केली . शिवाय ज्यांच्या घरी चोरी झाली त्यांची फिर्याद नोंदवून घेत गुन्हाही दाखल केला . याबाबत माहिती अशी की , चितोडरोडवरील संभाप्पा कॉलनीत प्लॉट नं.९ ७ येथे
जवरीलाल उर्फ जहवाल मांगीलाल जैन हे ५४ वर्षीय इसम आपल्या पत्नी व मुलासह राहतात . त्यांचा मुलगा बाहेरगावी गेलेला असल्याने व त्यांचे लेनिन चौकात मेडिकल दुकान असल्याने ते पत्नीसह काल सायंकाळी ६ वाजता घर बंद करुन गावात गेले होते . रात्री १० वाजता ते घरी परतले असता त्यांच्या घराचे दार आतून बंद असल्याचे आढळून आले . त्यामुळे आली शंका जवरीलाल जैन यांनी बाहेर जातांना
घराला बाहेरुन कुलूप लावले होते . मात्र , घरी आल्यावर दरवाजा आतून बंद असल्याने त्यांना काहीतरी गडबड झाल्याची शंका आली . परिणामी त्यांनी घराच्या मागील बाजूस जावून पाहिले असता मागचा दरवाजा उघडा दिसला . त्यामुळे नक्कीच घरात काहीतरी झाले आहे , याची खात्री पटल्याने त्यांनी परिसरातील लोकांना आवाज देवून बाहेर बोलविले . शिवाय त्यातील काहींना सोबत घेवून घरात प्रवेश केला असता मुलांच्या खालीतील तसेच बेडरुममधील लोखंडी कपाट उघडे दिसल्याने चोरी झाली हे लक्षात आले . रोकडसह लांबविले दागिने चोरट्यांनी घरातील मुलाच्या खोलीमध्ये असलेल्या कपाटातून सुमारे ७.५ लाखाची रोकड तर पत्नीच्या
कपाटातून ५० हजाराच्या रोकडसह दोन तोळे वजनाची सोन्याची चैन , ५ तोळे वजनाच्या आईच्या सोन्याच्या बांगड्या , ६ तोळे वजनाच्या सोन्याच्या पत्नीच्या बांगड्या , ४ तोळे वजनाची मंगलपोत , दुसरी २ तोळे वजनाची मंगलपोत , १ तोळे वजनाच्या ४ लेडीज अंगठ्या , ८ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याची अंगठ्या , ६ ग्रॅम वजनाचे कानातील जोड , ७ ग्रॅम वजनाचे ३ लहान कानातील जोड , ३ ग्रॅम वजनाची नथ असा एकूण २२ तोळे ४ ग्रॅम वजनाचे सोने लांबविले होते . हा ऐवज ९ लाख १२ हजार रुपये इतका पोलिस दप्तरी नोंदविला गेला असला तरी पत्यक्षात तो अडीच पटीने जास्त आहे . एमआयडीसीतील प्लॉटसाठी आणली होती रक्कम व्यापारी महासंघाच्या माध्यमातून धुळे एमआयडीसीत उद्योजकांना काही प्लॉट दिले जाणार आहेत .
जवरीलाल जैन यांना देखील एमआयडीसीत प्लॉट घ्यावयाचा असल्याने त्यांनी ही रक्कम घरात ठेवली होती . काल रात्री या संदर्भात व्यापारी महासंघात बैठकही होती . मात्र , काही कारणास्तव जैन यांना त्या बैठकीला जाता आले नव्हते . त्यामुळे आज ते पैसे घेवून थेट एमआयडीसीतच जाणार होते . मात्र , तत्पुर्वीच चोरी झाल्याने त्यांचे प्लॉट घेण्याचे स्वप्न अपूरेच राहणार आहे .