प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न,राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला पेयजल उपलब्ध करुन देण्याकरीता,13 हजार 668 कोटींचा आराखडा तयार –पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव ,भावेश ढाके

जळगाव— भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन समारंभानिमित्ताने ध्वजारोहणाचा जिल्हास्तरीय मुख्य समारंभ येथील पोलीस कवायत मैदानावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री ना. पाटील म्हणाले की, राज्यातील ग्रामीण जनतेला घरगुती वैयक्तिक नळजोडणीद्वारे शाश्वत व शुध्द पेयजल उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून महत्वाकांक्षी जलजीवन मिशन सुरु करण्यात आले आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत दरडोई किमान 55 लिटर पेयजल उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट असून या कार्यक्रमासाठी सुमारे 13 हजार 668 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नळ पाणीपुरवठा नसलेल्या राज्यातील 3 हजार 600 गावांकरीता नवीन योजना प्रस्तावित आहे. राज्यातील ग्रामीण भागातील शाळा व अंगणवाडी केंद्रांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट असून पाणी गुणवत्ता सर्वेक्षणासाठी प्रत्येक गावातील पाच महिलांचा सहभाग असणार आहे. राज्यात जानेवारी 2021 पर्यत 83 लाख 75 हजार घरगुती नळजोडणी झाली असून वैयक्तिक शौचालय बांधकाम योजनेतंर्गत 3 लाख 39 हजार 472 कुटूंबांना शौचालय उपलब्ध झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना जिल्हावासियांनी चांगली साथ दिल्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात येवू शकला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 62 कोटी रुपयांची तरतुद केली आहे. त्यातून जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचा टँक, कोरोना विषाणू निदान प्रयोगशाळा सुरु केली आहे. जिल्ह्यातील उप जिल्हा व ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण झाले असून जिल्हा रुग्णालयात स्कॅनिंगची यंत्रणा सुरू केली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 10 ते 12 आयसीयु तर 100 ऑक्सीजनयुक्त बेड तयार केले. आजच्याघडीला जिल्ह्यात 322 आयसीयु तर 2019 ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्ध आहे. रुग्णालयातील सुविधांमुळे आपले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सुपर स्पेशालीटी दर्जाचे हॉस्पिटल झाल्याचे गौरोवोद्गार त्यांनी काढले.
शेतकरी हा राज्याच्या विकासाचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे शासन कटिबध्द असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंमलात आणली. या योजनेतून जिल्ह्यातील 1 लाख 57 हजार 37 शेतकऱ्यांना 896 कोटी 34 लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. तर कर्जमुक्ती मिळालेल्या 2 लाख 26 हजार 944 शेतकऱ्यांना 1518.63 कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत करण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषि पंपाच्या वीजबिलात सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रथमवर्षी सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रक्कम भरल्यास वीज बील कोरे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कृषिपंप ग्राहकाने चालू बिल भरणे आवश्यक आहे. जळगाव जिल्ह्यात 2 लाख 7 हजार 740 कृषिपंप वीज ग्राहक ग्राहक असून त्यांच्याकडे 3338 कोटी 84 लाख रुपयांची थकबाकी आहे. या योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1 हजार 93 कोटी 45 लाख रुपयांची सूट मिळणार आहे. यापुढेही राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
निसर्गाचीही अवकृपेमुळे जुलै ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत अतिवृष्टी, पूर, गारपीटचा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना फटका बसला. राज्य शासन शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी धावून आले. आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 37 कोटी 60 लाख 18 हजार रुपयांची मदत दोन हप्त्यात केली आहे. जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या 62 शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख याप्रमाणे 62 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात शेतकरी बांधवांचा कापूस घरात पडून होता. पणन महासंघाच्या माध्यमातून कापूस खरेदीचा धाडसी निर्णय राज्य शासनाने घेतला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असतानाही आपल्या जिल्ह्यातून 34 हजार 74 शेतकऱ्यांकडील 13 लाख 15 हजार 551 क्विंटल कापसाची खरेदी झाली. त्याचबरोबर जिल्ह्यात 17 भरडधान्य खरेदी केंद्र सुरु करुन 54 हजार 134 क्विटंल मका, 860 क्विंटल बाजरी तर 65 हजार 939 क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात तूर्तास टंचाई सदृश परिस्थिती नसली तरी या वर्षाकरीता 2 कोटी 3 लाख 18 हजार रुपयांचा संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री महोदयांची महत्वाकांक्षी योजना ‘विकेल ते पिकेल’राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांच्या गटामार्फत थेट विक्रीसाठी शेतकरी कंपनी स्थापन करून शेतकरी उत्पादक कंपनी व खरेदीदारांची साखळी निर्माण करण्यात येत आहे.
पालकमंत्री शेत पाणंद रस्ता योजनेतंर्गत जिल्ह्यात 500 कामांना मंजूरी देण्यात आली असून पैकी 180 कामे पूर्ण झाली. याकरीता जिल्हा नियोजन समितीकडून 5 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांना वॉल कम्पाऊंडसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असून जिल्हा वार्षिक योजनेचा 513 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे. जिल्ह्यातील कोणीही व्यक्ती बेघर राहू नये, त्याला आपल्या हक्काचे घर मिळावे म्हणून राज्य शासनामार्फत महाआवास अभियान राबविण्यात येत असून या अभियानाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे. मुख्यमंत्री महोदयांनी शिवभोजन थाळी योजना सुरू केली. या योजनेची जिल्ह्यात 38 शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून अतिशय चांगल्याप्रकारे अंमलबजावणी सुरू आहे. ही योजना लॉकडाऊनच्या काळात गोरगरिब व गरजूंसाठी वरदान ठरली आहे. यापुढेही जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विकास कामांच्या माध्यमातून व जिल्हावासियांच्या सहकार्याने जिल्ह्याची विकासाची घोडदौड यापुढेही सुरु ठेवण्यासाठी बांधील असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
येथील पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडल्यानंतर राष्ट्रगीत झाले. यानंतर पालकमंत्री ना. पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांना त्यांच्या जागेवर जाऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ध्वजारोहण समारंभानंतर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पोलीस दलामार्फत मानवंदना देण्यात आली. पोलीस दलाच्या बॅण्डपथकाने वाजविलेल्या देशभक्तीपर गीतांच्या धुनमुळे कार्यक्रमस्थळावरील वातावरण भारावले होते.
मान्यवरांचा सन्मान
कार्यक्रमानंतर ना. पाटील यांच्या हस्ते पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8 वी) राज्य गुणवत्ता यादीत आल्याबद्दल जिश्नू कुंदन चौधरी, सेंट अलॉयसिएस हायस्कूल, भुसावळ सीबीएसई/आयसीएसई शाळांतील विद्यार्थी आर्या राहुल महाजन, रुस्तुमजी इंटरनॅशनल स्कूल, जळगाव प्रज्ञा संजय प्रजापत, शिंदे इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा आर्या नितीन पाटील, सेंट जोसेफ कॉन्व्हेंट सिनीयर सेंकडरी स्कूल, जळगाव, हेमल सुशिलकुमार राणे, सेंट जोसेफ कॉन्व्हेंट सिनीयर सेंकडरी स्कूल, जळगाव नचिकेत किरण पाटील, पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चोपडा अर्चित राहुल पाटील, काशिनाथ पलोड, पब्लिक स्कूल, सावखेडा, बु. ता. जि.जळगाव मोक्षेंद्र विजय पाटील, जवाहर नवोदय विद्यालय, साकेगांव ता. भुसावळ यांचा तर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्यामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेली कु. माधुरी सुनिल पाटील, तृतीय वर्ष विज्ञान, अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय, द्वितीय क्रमांक श्री. निखील अरुण पाटील तृतीय वर्ष विज्ञान, रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालय, भडगाव, तृतीय क्रमांक कु. क्षमा यशवंत तायडे, तृतीय वर्ष कला, एम. जे. कॉलेज, जळगाव यांचा पालकमंत्र्यां हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे सिव्हील हॉस्पिटल, जळगाव, डॉ. उल्हास पाटील, मेडीकल कॉलेज ॲन्ड हॉस्पिटल, जळगाव, ऑर्कीड मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, जळगाव, सुलोचन रेटीना केअर सेंटर, जळगाव, साईपुष्प ॲक्सीडेंट हॉस्पीटल, जळगाव, जीवनज्योती कॅन्सर हॉस्पिटल, जळगाव, खडके हॉस्पिटल ॲन्ड हेल्थकेअर प्रायव्हेट लिमीटेड, जळगाव, जे.पी.सी.बँक, रामदास पाटील स्मृतीसेवा ट्रस्ट राजे श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, जळगाव, डॉ. भंगाळे सर्जीकल ॲन्ड नर्सिग होम, जळगाव यांना गौरविण्यात आले.
जळगाव पोलीस दलातील प्रदिप पंढरीनाथ चांदेलकर, सहाय्यक फौजदार, एरंडोल पोलीस स्टेशन, विठ्ठल पंडील देशमुख, पोलीस हेड कॉन्स्टेबल, जिल्हा विशेष शाखा (ATC) जळगाव, अनिल राजाराम इंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव, सुनिल भाऊराम चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल, वाचक शाखा, पोलीस अधिक्षक कार्यालय, जळगाव यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाल्याने त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले.
जळगाव जिल्ह्यासाठी ध्वजदिन निधी संकलनाचा इष्टांक वेळेच्या आत पूर्ण करण्यात आल्याने संचालक सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून प्राप्त स्मृतीचिन्ह पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना प्रदान करण्यात आले. महाकृषि उर्जा सौर कृषि पंप योजनेतंर्गत श्री. भरत गोविंद वानखेडे, सुनसगाव, ता. भुसावळ, किरण पाढुरंग मोरे, वडगाव, ता. चाळीसगाव, विठ्ठल चिंताराम पाटील, वनकोठे ता. एरंडोल, ज्ञानेश्वर माधवराव पाटील, ता. जळगाव, कैलास नामदेव तेली, पिंपळगाव, ता. पाचोरा, तुळशीराम गणपत पाटील, मुदखेडे, ता. चाळीसगाव यांना डिमांड नोट देण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास जिल्हाधिकारी अभिजीत राउात, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, उप वनसंरक्षक विवेक होशिंग, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, प्रसाद मते, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले, तहसीलदार सुरेश मोरे यांचेसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याचे सुत्रसंचालन सरिता खाचणे आणि अपूर्वा वाणी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, प्रसाद मते, राजेंद्र वाघ, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकारात हुलवळे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले, तहसीलदार सुरेश थोरात, पंकज लोखंडे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते त्यांच्या शासकीय निवासस्थानीही ध्वजारोहण करण्यात आले.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक 3 च्या आवारातही सकाळी आठ वा. ध्वजवंदन करण्यात आले. जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक विवेक होशिंग यांच्या हस्ते ध्वजवंदन करुन सामुहिक राष्ट्रगीत गायन करुन राष्ट्रध्वजास अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजसिंग परदेशी, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, सहायक मुद्रांक अधिकारी सुनील पाटील यांचेसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सर्व उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close